रे नगर येथे माकपच्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरास उत्साहात प्रारंभ

सोलापूर :- अखंड लढा व श्रमिकांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या 30 हजार असंघटित कामगारांच्या रे नगर या जगातील पथदर्शी गृहप्रकल्पाच्या परिसरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय वैचारिक अभ्यास शिबिरास शुक्रवारी उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते व राज्य सचिव मंडळाच्या सदस्य शुभा शमीम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी केंद्रीय समिती सदस्य बादल सरोज, राज्य सचिव मंडळ सदस्य विजय गाभणे, सुनील मालुसरे, शैलेंद्र कांबळे, किरण गहला, जिल्हा सचिव मेजर युसूफ शेख आदी उपस्थित होते. राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी प्रास्ताविक तर अ‍ॅड. एम. एच. शेख यांनी स्वागत करून दिवंगतांना आदरांजलीचा शोक प्रस्ताव मांडला. प्रारंभी लाल झेंडा फडकावून शहिदांना अभिवादन करण्यात आले. प्रजा नाट्य मंडळाच्या कलावंतांनी क्रांतिकारी गीते सादर केल्यानंतर माकपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी रे नगर दुमदुमून गेले.