काँग्रेसला मोठा धक्का; आमदार डॉ. प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर
हिंगोली येथील काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव
भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिळालेल्या
माहितीनुसार, गुरुवारी १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे
त्या भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे काँग्रेस पक्षाला मोठा
धक्का बसल्याचे मानले जात आहे.
डॉ. प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या
पत्नी असून सातव कुटुंब काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे मानले
जाते. त्या विधान परिषदेच्या आमदार असून काँग्रेसकडून दोन टर्म निवडून आल्या आहेत.
मागील विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती आणि
त्या विजयी झाल्या होत्या.
मात्र, अलीकडच्या काळात पक्षातील अंतर्गत गटबाजी,
दुर्लक्ष आणि असंतोषामुळे त्या नाराज असल्याचे दिसत होते. त्यामुळे
त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला आहे. या संदर्भात आमदार सातव
यांच्याशी संपर्क होऊ शकला नसला तरी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
या प्रवेशासाठी त्यांचे कार्यकर्ते बुधवारीच मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, या संभाव्य पक्षांतरावर काँग्रेसने सावध
प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी
सांगितले की, काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना आमदारकी दिली
आहे. त्या असा टोकाचा निर्णय घेतील असे वाटत नाही. ही बातमी तथ्यहीन असून पक्ष
त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्याशी संवाद सुरू आहे.
स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने
प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. त्या सध्या महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष आहेत. २०२१ मध्ये रिक्त झालेल्या जागेवर त्या
बिनविरोध निवडून आल्या, तर २०२४ मध्ये पुन्हा एकदा निवडून आल्या
आहेत. त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ २०३० पर्यंत आहे.