सोलापूरपर्यंत झेपावले थंड उत्तरी वारे; जेऊरमध्ये ९ अंशांवर पारा, राज्यभर थंडीचा कडाका वाढला

मुंबई : उत्तर भारतातून येणारे थंड आणि कोरडे वारे आता थेट सोलापूरपर्यंत झेपावले आहेत. त्यामुळे सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर (ता. करमाळा) येथे तापमानात मोठी घट नोंदवली गेली. रविवारपेक्षा किमान तापमान कमी होऊन ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले, जे सरासरीपेक्षा तब्बल १४ अंशांनी कमी आहे. त्यामुळे परिसरात अतितीव्र थंडीची लाट जाणवली. मुंबईतही हवामानात बदल जाणवला असून, सोमवारी शहराचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाल्याने, रात्री आणि पहाटे मुंबईकरांना गारव्याचा दिलासा मिळाला आहे. जळगावमध्येही पारा घसरला असून, तेथील तापमान ९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे सरासरीपेक्षा ६.४ अंशांनी कमी आहे. जळगावचे कमाल तापमानही २९.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे नेहमीपेक्षा ३.७ अंशांनी कमी आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, नंदुरबार, नांदेड, सांगली, डहाणू तसेच विदर्भातील शहरांमध्येही थंडीच्या लाटेसदृश परिस्थिती अनुभवली गेली आहे. तीन दिवसांत पारा घसरणार हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत म्हणजे बुधवारपर्यंत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, सांगली, डहाणू, संभाजीनगर, बीड, परभणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका राज्यभर वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.