चमोली जिल्ह्यात ढगफुटी; घरे, बाजार व एसडीएम निवासस्थानाचे नुकसान, २ जण बेपत्ता

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील थराली भागात मध्यरात्री ढगफुटीची घटना घडली. या ढगफुटीमुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले असून दोन जण बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. घटना घडल्यानंतर एसडीआरएफ, पोलीस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. थराली पोलिसांनी तत्परता दाखवत स्थानिक नागरिकांना त्यांच्या घरातून सुरक्षित स्थळी हलवले. मुख्यमंत्रींची प्रतिक्रिया उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, “चमोली जिल्ह्यातील थराली भागात ढगफुटी झाल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ व पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य सुरू आहे आणि मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.” नुकसानीचा आढावा ढगफुटीमुळे घरे, बाजारपेठ आणि एसडीएम निवासस्थानाचे नुकसान झाले. एसडीएम निवासस्थान सुमारे चार फूट ढिगाऱ्याने भरले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रशासनाकडून सतत हालचाली सुरू असून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.