राष्ट्रवादीच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्याची उपस्थिती; सोलापूर शहराध्यक्षांवर वाद

मुंबई | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्याचा प्रवेश:
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध जिल्हा आणि शहराध्यक्षांना सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी स्वत:ऐवजी भाजप कार्यकर्त्याला या बैठकीला पाठविल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोलापूरमधील काही राष्ट्रवादी नेत्यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी त्या व्यक्तीचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो प्रसिद्ध करून धुमाकूळ घातला आहे.

 वादाचा उगम:

सोलापूर शहरातून या बैठकीत भारत जाधव, यु. एन. बेरिया आणि महेश गाडेकर उपस्थित होते. खरटमल यांना या बैठकीला जाणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी आपले तिकीट निश्चित न झाल्याने जाणे शक्य नसल्याचे कारण दिले. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या ओळखीतील महेश गाडेकर यांना प्रतिनिधी म्हणून पाठविले. ही माहिती समजताच प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर आणि काही पदाधिकाऱ्यांनी खरटमल यांना भेटून स्पष्टीकरण मागितले.

 शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचे म्हणणे:

"मी स्वतः जाणार होतो, पण माझे तिकीट कन्फर्म झाले नव्हते. त्यामुळे मी गेलो नाही. मुंबईत माझा मित्र महेश गाडेकर याला मी बैठकीला पाठवले होते, जेणेकरून तो आढावा घेऊ शकेल," असे स्पष्टीकरण सुधीर खरटमल यांनी दिले आहे. मात्र पक्षातील काही नेत्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत तपासाची मागणी केली आहे.