भाजप आमदाराचाच धक्कादायक दावा: “५० खोके ही घटना सत्य, संतोष बांगर यांनी ५० कोटी घेतले” – हिंगोलीत शिंदेसेना-भाजपात तापलेलं रणांगण
हिंगोली :- राज्यातील राजकारणात गाजलेला “५० खोके एकदम ओके” हा
विरोधकांचा नारा पुन्हा एकदा जोरात चर्चेत आला आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर
अनेक आमदारांनी एकनाथ शिंदेंची साथ घेतली. ठाकरे गटाने सातत्याने या आमदारांना
प्रत्येकी ५० कोटी मिळाल्याचा आरोप केला होता. आता मात्र या आरोपालाच भाजप आमदार
तानाजी मुटकुळे यांनीच दुजोरा दिल्याचं चित्र दिसत आहे. अलीकडेच एका पत्रकार
परिषदेत तानाजी मुटकुळे यांनी “संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेंसोबत
जाण्यासाठी ५० कोटी घेतले होते” असा खळबळजनक दावा केला. पत्रकारांनी विचारले
तेव्हा ते म्हणाले – “मी केलेले विधान गंभीर आहे, पण ते खरे आहे. इतरांचे माहित नाही, परंतु संतोष
बांगर यांनी ५० कोटी घेतल्याचे मला निश्चित माहित आहे.” मुटकुळे पुढे म्हणाले की,
“आदल्या दिवशीपर्यंत बांगर रस्त्यावर उतरून लोकांना ठाकरे गटात
राहण्याचे सांगत होते. पण दुसऱ्या दिवशी अचानक ५० कोटी घेऊन शिंदे गटात गेले.” मुटकुळे
यांच्या या विधानाने हिंगोलीतील राजकारणात खळबळ उडवली आहे.
हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी मित्रपक्ष भाजप
आणि शिंदेसेना एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. सुरूवातीपासूनच आरोप-प्रत्यारोपांनी
निवडणूक गाजत होती. अलीकडेच शिंदेसेनेने भाजपाचे दोन उमेदवार फोडून भाजपला मोठा
धक्का दिला. हिंगोलीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपची दावेदारी असताना, शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर स्वतः मैदानात उतरले आणि नगराध्यक्ष तसेच
नगरसेवक पदांसाठी उमेदवार उभे केले. यामुळे दोन मित्रपक्षांमध्ये थेट संघर्षाची
परिस्थिती निर्माण झाली. निवडणुकीदरम्यान बांगर आणि मुटकुळे यांच्यात अनेकदा तीव्र
वाद झाले.
‘५० खोके’ दावा पुन्हा पेटला
मुटकुळे यांच्या विधानामुळे ठाकरे गटाने केलेले आरोप
पुन्हा एकदा सत्य असल्याची चर्चा जनतेत सुरू झाली आहे. राज्यभरात “५० खोके एकदम
ओके” हा नारा गाजला होता. आता भाजप आमदारानेच या आरोपाला मान्यता दिल्याने राजकीय
वातावरण आणखी तापले आहे.