हमासच्या कैदेतून परतला ‘निर्जीव’ बिपिन जोशी; दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आईच्या डोळ्यात अश्रूंचा पूर
काठमांडू/तेल अवीव :
२०२३ मध्ये कृषी संशोधनासाठी इस्रायलला गेलेला नेपाळचा विद्यार्थी बिपिन
जोशी अखेर आपल्या आईच्या कुशीत नव्हे, तर मृतदेहाच्या रूपात
परतला. हमासच्या कैदेत तब्बल ७३८ दिवसांनंतर त्याचा मृतदेह इस्रायली अधिकाऱ्यांकडे
सुपूर्द करण्यात आला. इस्रायल आणि हमास यांच्यातील गाझा शांती करार लागू
झाल्यानंतर, हमासने २० जिवंत ओलीसांची सुटका केली, मात्र त्याचवेळी बिपिन जोशीसह चार जणांचे मृतदेह इस्रायलला परत दिले.
आईची
हृदयद्रावक प्रतीक्षा संपली
बिपिनच्या आईने दोन वर्षांपासून मुलाच्या सुटकेसाठी नेपाळ
सरकार, इस्रायल आणि अगदी अमेरिकेकडूनही मदत मागितली होती. प्रत्येक दिवशी मुलगा
परत येईल या आशेवर ती जगत होती. पण अखेर तिच्या हाती निर्जीव बिपिनचं पार्थिवच आलं.
नेपाळचे इस्रायलमधील उच्चायुक्त धन प्रसाद पंडित यांनी सांगितले की, बिपिन जोशीचे पार्थिव सोमवारी तेल अवीवमध्ये आणले गेले, जिथे नेपाळ सरकारच्या मदतीने अंत्यसंस्कार होतील. त्यानंतर त्यांच्या
अस्थी नेपाळला पाठवण्यात येतील.
कृषी
शिक्षणासाठी गेलेला बिपिन जोशी हमासच्या हाती सापडला
बिपिन जोशी हा नेपाळमधील एका छोट्या शहरातील रहिवासी
होता. तो सप्टेंबर २०२३ मध्ये किबुत्ज अलुमिम येथे शेती संशोधनासाठी गेला होता. ७
ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला केला तेव्हा बिपिन आणि त्याचे
सहकारी बॉम्ब शेल्टरमध्ये लपले होते. हमासच्या दहशतवाद्यांनी बॉम्ब फेकल्याने
तेथील अनेक विद्यार्थी जखमी झाले.
बिपिनचा
शेवटचा व्हिडीओ
एक व्हिडीओ इस्रायली सैन्याने प्रसिद्ध केला होता, ज्यात बिपिन जोशीला हमासचे दहशतवादी गाझातील शिफा हॉस्पिटलमध्ये फरफटत
नेताना दिसत होते.
साहस दाखवत त्याने दहशतवाद्यांच्या दिशेने बॉम्ब परत फेकला होता,
मात्र त्यानंतर त्याला पकडून गाझात नेण्यात आले.
२५व्या
वाढदिवसापूर्वी मृत्यूचा वार
जर तो जिवंत असता, तर २६ ऑक्टोबर रोजी बिपिन जोशी २५
वर्षांचा झाला असता. त्याच्या मृत्यूने केवळ नेपाळच नव्हे तर संपूर्ण दक्षिण
आशियातील नागरिक हादरले आहेत.