भोपाळ : दूषित खोकल्याच्या सिरपने ११ चिमुकल्यांचा मृत्यू, डॉक्टर आणि औषध कंपनीवर गुन्हा
भोपाळ | ऑक्टोबर २०२५
मध्य प्रदेशात भीषण आरोग्यघोटाळा उघडकीस आला आहे. छिंदवाडा
जिल्ह्यात दूषित खोकल्याचे औषध प्यायल्याने तब्बल ११ चिमुकल्यांचा मृत्यू झाला
आहे. या प्रकरणी स्थानिक बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली असून,
‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’ (तमिळनाडू) या
औषधनिर्मिती कंपनीच्या संचालकांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
विषारी सिरप ‘कोल्ड्रिफ’मुळे मृत्यू
‘कोल्ड्रिफ (Coldrif)’ नावाच्या या सिरपमुळे
पाच वर्षांखालील मुलांचे मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू झाला. प्रयोगशाळा चाचणीत या
औषधात डायएथिलीन ग्लायकॉल (DEG) हे विषारी रसायन आढळले. हे
रसायन सामान्यतः ब्रेक फ्लुइड्स आणि अँटीफ्रीझ मध्ये वापरले जाते.
डॉक्टर आणि कंपनीवर कारवाई
रविवारी पहाटे परासिया पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात
आला. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०५ आणि २७६ अंतर्गत
डॉ. सोनी आणि कंपनी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाची तक्रार BMO डॉ. अंकित सहलम यांनी
केली होती.
प्रयोगशाळा अहवालातून उघड
भोपाळ आणि तामिळनाडूतील सरकारी प्रयोगशाळांनी चाचणी केली असता,
सिरपच्या नमुन्यात ४६–४८% DEG रसायन आढळले.
दोन्ही अहवालांत या सिरपला आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लक्षणे
आणि परिणाम
पाच वर्षांखालील मुलांना खोकला, सर्दी आणि ताप
यासाठी हे औषध देण्यात आले होते. परंतु काही दिवसांतच त्यांना
- लघवी कमी होणे
- मूत्रपिंड निकामी
होणे
अशी लक्षणं दिसू लागली. यापैकी १० मुलांचा नागपूरच्या GMC रुग्णालयात मृत्यू झाला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा
केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की दोन वर्षांखालील मुलांना खोकला
आणि सर्दीवरील औषधे देऊ नयेत, तसेच पाच वर्षांखालील
मुलांसाठी ही औषधे टाळावीत. लहान मुलांमधील बहुतेक सर्दी-खोकला आपोआप बरा होतो,
औषधांची गरज नसते.
हायलाइट्स
- दूषित ‘कोल्ड्रिफ’
सिरपमुळे ११ मुलांचा मृत्यू
- डायएथिलीन ग्लायकॉल
रसायनाचा प्रयोगशाळेत शोध
- बालरोगतज्ञ डॉ. सोनी
यांना अटक
- तामिळनाडूतील स्रेसन
फार्मा कंपनीवर गुन्हा
- केंद्र सरकारकडून
लहान मुलांसाठी औषधवापरावरील सूचना