बंजारा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून तरुणाचा आत्महत्येचा निर्णय; गेवराईत हृदयद्रावक घटना
गेवराई (बीड) : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (Scheduled
Tribe - S.T.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या
गंभीर आणि दीर्घकालीन मागणीसाठी गेवराई तालुक्यातील केंकत पांगरी येथील प्रवीण
बाबूराव जाधव (वय ३५) या तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली
आहे. प्रवीण जाधव यांनी आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर
केला, ज्यात त्यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आपले जीवन
अर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्या या टोकाच्या निर्णयाने
संपूर्ण परिसर हादरला आहे. घटनेनंतर गावात आणि बंजारा समाजात शोककळा पसरली असून,
नागरिकांकडून शासनाविरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.
समाजातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन बंजारा
समाजाला तत्काळ एस.टी. प्रवर्गातील आरक्षण द्यावे, अशी मागणी
केली आहे. प्रवीण जाधव यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि
दोन लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ गमावल्याने त्यांच्या घरावर
दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला
आहे. या घटनेमुळे केवळ गेवराई तालुका नव्हे तर संपूर्ण बंजारा समाजात संतापाची लाट
उसळली आहे.