बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन; नागपूरचे प्रमुख महामार्ग ठप्प
नागपूर: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे
अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या
आंदोलनाने कालपासून नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेची अक्षरशः 'नाडी' दाबली आहे. आंदोलकांनी वर्धा रोडवरील
केंद्रबिंदू ठिकाणी चक्काजाम केल्याने देशाच्या विविध दिशांना जोडणारे महामार्ग
ठप्प झाले आहेत. आज, मंगळवारी (२५ ऑक्टोबर) दुसऱ्या दिवशीही
या महामार्गावरील परिस्थिती 'जैसे थे' असून,
हजारो नागरिक आणि प्रवासी वेठीस धरले गेले आहेत.
रणनीतीपूर्वक
आखलेले आंदोलन:
आंदोलनासाठी बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
नागपूरजवळील वर्धा रोड हे ठिकाण मुद्दाम निवडले आहे. कारण हा परिसर देशाच्या चारही
दिशांना जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचा केंद्रबिंदू मानला जातो. प्रशासनाने
आंदोलकांना बुटीबोरीहून परसोडी येथील केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्राजवळ
रोखण्याची तयारी केली होती. परंतु, बच्चू कडूंनी गनिमी कावा वापरून नियोजित
स्थळापूर्वीच चक्काजाम सुरू केला, ज्यामुळे प्रशासनाचे सर्व
नियोजन फसले.
ठप्प
झालेले प्रमुख महामार्ग:
आंदोलनामुळे खालील महत्त्वाचे महामार्ग ठप्प झाले आहेत –
- वर्धा रोड (NH-44)
- चंद्रपूर मार्ग (NH-353)
- हैदराबाद मार्ग
- जबलपूर मार्ग
- रायपूर मार्ग
- अमरावती आणि मुंबई
महामार्ग
या ठिकाणाहून कन्याकुमारी, कोलकाता आणि दिल्ली दिशेने जाणारी
वाहतूकही अडथळ्यांत आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांतील प्रवासातही विलंब झाला आहे.
प्रशासन
सतर्क, परंतु परिस्थिती तणावपूर्ण:
पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी तैनात असून, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आंदोलकांनी
चक्काजाम सोडण्यास नकार दिल्याने परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. प्रहार संघटनेचे
म्हणणे आहे की, “सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तत्काळ
जाहीर केली पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”