अक्कलकोट रस्ता एमआयडीसीत रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे

अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांची वाट लागली असून जुनी लाईफ लाइन कंपनी ते निवास स्पिनिंग मिल दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले आहे. त्यावेळी रस्ते खोदण्यात आले होते. त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतरही रस्ते तयार करण्यात आले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर एक ते दीड फूट खोलीचे मोठे खड्डे पडल्याने पायी व वाहनांवरून जाणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यात पडून लोक जखमी होत आहेत. याच मार्गावरून संगमेश्वर नगर, पडगाजी नगर, ईश्वर नगर, मल्लिकार्जुन नगर आदी परिसरातील कामगार व महिला एमआयडीसीत कामाला पायी येत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिका व एमआयडीसी प्राधिकरणाने लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.