माळेगाव निवडणूक : “उमेदवार जिंकले नाहीत तर निधीत काठ मारणार” — अजित पवारांचा थेट इशारा
बारामती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर माळेगाव नगरपंचायतीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
मतदारांना थेट संदेश देत मतदानाचा स्पष्ट दिशादर्शन केले. आपल्या पॅनेलमधील १८ही
उमेदवार जिंकले नाहीत तर माळेगावच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीत “काठ मारणे”
अपरिहार्य होईल, असा इशारा त्यांनी दिला.
“वाढपी तुमच्या समोर उभा आहे” – अजित पवार
शुक्रवारी झालेल्या सभेत पवार म्हणाले,
“एका झटक्यात सगळी काम होत नाहीत. त्यासाठी व्हिजन लागतं. मतभेद
असले तरी बाजूला ठेवावे लागतात. अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे. वाढपी जसा ओळखीचा
असेल तर पंगतीत बसताना बरं वाटतं, तसाच वाढपी तुमच्या समोर
उभा आहे.”
त्यांनी पुढे माळेगावच्या विकासासाठी मोठ्या निधीची
आवश्यकता असल्याचे सांगितले.
“पाच-सहा कोटींच्या बजेटमध्ये विकास शक्य
नाही”
पवार म्हणाले,
“माळेगावचं वार्षिक बजेट फक्त पाच-सहा कोटींचं आहे. त्या पैशात
कितीही वर्ष घासली तरी विकास होऊ शकत नाही. बारामतीसारखा विकास करायचा असेल तर
हजारो कोटींची गरज आहे. ती क्षमता माझ्याकडे आहे.”
नगरपंचायत त्यांच्या विचारांची नसेल तर त्यांना अडचण नाही, पण त्यांच्या विचारांचे लोक निवडून आले तर निधीचा योग्य वापर
मार्गदर्शनासह करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
थेट इशारा : “तुम्ही काठ मारली तर मीही काठ मारणार”
आपल्या भाषणात पवारांनी मतदारांना स्पष्टपणे चेतावणी
दिली:
“अठरा उमेदवार निवडून द्या. मी साधू-संत नाही. तुम्ही मला मत द्या,
मी काम करतो. माझ्याकडे चौदाशे कोटींचा निधी आहे. पण तुम्ही काठ
मारली तर मी पण काठ मारणार. तुमच्या हातात मत आहे, माझ्या
हातात निधी आहे.”
“मन मोठं करा, संकुचित
विचार सोडा”
पवारांनी जनतेला संकुचित राजकारण बाजूला ठेवून
विकासाभिमुख विचार करण्याचे आवाहन केले.
“कोणी संपत नाही. मन मोठं करा. अठराही उमेदवार निवडून दिलेत तर
तुम्ही सांगाल ते सगळं देतो. सामान्य बारामतीकर माझ्या सोबत आहे,” असे ते म्हणाले.