सूरज चव्हाणच्या लग्नानंतर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर रुग्णालयात दाखल.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात विजेतेपद पटकावलेल्या सूरज चव्हाणचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य सोहळ्यात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. लग्नपत्रिकेत सूरजने अनेक नामांकित व्यक्तींच्या नावे समाविष्ट केली होती, ज्यामुळे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. पण या सोहळ्यात वेगळेच लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने. हळदीपासून लग्नसमारंभापर्यंत जान्हवीने आपल्या लूक आणि उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. तिने नववधू-वरांसोबत धमाल डान्सही केला. मात्र, हेच तिला महागात पडल्याचे दिसत आहे. लग्नावरून परतताच जान्हवीची तब्येत बिघडली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने स्वतः रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, “नजर इज रिअल”. तिचा फोटो पाहताच चाहत्यांची चिंता वाढली असून अनेकांनी कमेंट करत काळजी व्यक्त केली. “छान दिसत होती म्हणून नजर लागली असेल…” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. तर काहींनी “तुला काळजी घ्यायला हवी” असे म्हटले आहे. यापूर्वीही सूरजच्या लग्नातील मोठी गर्दी पाहून जान्हवीने संताप व्यक्त केला होता. तिचा त्या संदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सध्या जान्हवीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीबाबत चाहत्यांकडून लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.