"अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा कार अपघात; सिटीफ्लो बसवर गंभीर आरोप"

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा अपघात झाल्याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आहे. तिच्या गाडीला सिटीफ्लो बसने धडक दिली असून, या घटनेनंतर शिल्पाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत शिल्पाने लिहिले, “आज सिटीफ्लोची एक बस माझ्या गाडीला धडकली. त्यांच्या मुंबईतील ऑफिसचे प्रतिनिधी योगेश कदम आणि विलास मांकोटे यांनी सांगितले की ही कंपनीची जबाबदारी नाही, तर चालकाची जबाबदारी आहे. किती निर्दयी लोक आहेत हे... चालकाला किती पगार मिळत असेल?” सोबतच तिने अपघातानंतर नुकसान झालेल्या गाडीचे फोटोही शेअर केले. सुदैवाने या अपघातात शिल्पा किंवा तिच्या स्टाफला दुखापत झाली नाही, पण तिच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. शिल्पाने मुंबई पोलिसांचे आभार मानत लिहिले, “धन्यवाद मुंबई पोलिस. तुम्ही तक्रार नोंदवण्यासाठी त्वरित मदत केलीत. सिटीफ्लो, तुम्ही या प्रकरणात माझ्याशी संपर्क साधलात तर त्याचे कौतुक होईल.” कामाच्या बाबतीत, शिल्पा लवकरच ‘जटाधरा’ या थ्रिलर चित्रपटातून झळकणार आहे, जो अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्याच्या गूढ परंपरेभोवती फिरतो. तसेच ती ‘शंकरा – द रिव्होल्यूशनरी मॅन’ या चित्रपटातही झळकणार आहे. अलीकडेच ती ‘बिग बॉस १८’मध्ये दिसली होती.