आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई

सोलापूर-  आवाजाची मर्यादा पाळून मिरवणुका काढायला कोणाचाही विरोध नाही, पण आवाजाची पातळी ओलांडल्यास यापुढे पोलिसांकडून ध्वनिप्रदूषण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून संबंधित मंडळांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिला. गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना कमी आवाजात व शांततेत झाली, आता विसर्जन मिरवणुकीत 95 टक्के मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुका देखील डीजेमुक्त निघतील, असा विश्वास पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी व्यक्त केला आहे.  वर्षभरातील सर्वच जयंती आणि इतर उत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. सर्वांसाठी समान निर्णय असणार आहे. मागच्या वर्षी ‘श्रीं’च्या सांगता मिरवणुकीत 192 मंडळांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षी जवळपास 200 मंडळे सहभागी होण्याची शक्यता आहे. तरीही आवाजाची मर्यादा ही कमी होईल, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. डीजेमुक्त सोलापूर व्हावे, अशी सर्वांचीच मागणी असून त्या अनुषंगाने मध्यवर्ती मंडळे, डीजे व्यावसायिकांची देखील पोलिसांनी बैठक घेतली. त्यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोलापूर शहरात डीजेच्या कर्णकर्कश आवाज ऐकू आला नाही. त्याबद्दल अनेकांनी फोन करून समाधान व्यक्त केले. आवाजाची मर्यादा पाळून मिरवणुका काढायला कोणाचाही विरोध नाही, पण आवाजाची पातळी ओलांडल्यास यापुढे पोलीस ध्वनिप्रदूषण कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित मंडळांवर कडक कारवाई करतील, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेसाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, हसन गौहर हे उपस्थित होते.

 स्पीकर, डेकोरेशनवर बंधने नाहीत

गणेशोत्सवाच्या मंडपात स्पीकरवर गाणे वाजवायची नाहीत, डेकोरेशन सुरू ठेवायचे नाही असा गैरसमज पसरवला जात आहे, अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नका. शेवटच्या तीन दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत साऊंड सिस्टिम आणि लाईट डेकोरेशन सुरूच असणार आहे. परंतु आवाजाची मर्यादा ही ओलांडू नये. आवाजाचा कोणाला त्रास झाला तर त्यांनी 112 वर किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, अशा मंडळांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी सांगितले.