श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची शाही मिरवणूक पंचध्वज, सनई चौघडा, कटपुतलींचा पारंपरिक खेळ

सोलापूर शहरातील श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना मिरवणूक बुधवारी सकाळी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडली. पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळा येथे सकाळी ११ वाजता सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते महापूजा आणि आरती संपन्न झाली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. या प्रसंगी कसबा गणपती उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे, ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, ॲड. मिलिंद थोबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मिरवणुकीत सनई चौघडा, पंचरंगी झेंडे, बैल व घोड्यांच्या जोड्या, सुमारे ४०० युवकांचे लेझीम पथक, लोकमान्य टिळकांचा फलक, हलग्या आणि पालखी अशा पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यात लेझीम पथकाचे सुंदर खेळ विशेष आकर्षण ठरले. मिरवणूक मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती, लोखंड गल्ली, मंगळवार पेठ, चाटी गल्ली, बाळीवेस चौक मार्गे कसबा गणपती मंदिरात पोहोचली. तेथे उत्सव समितीच्या वतीने गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.