इंडोनेशियातील सुमात्रा बेटाला 6.4 तीव्रतेचा भूकंप; घरे हादरली, लोक घाबरून बाहेर पडले

 इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर आज सकाळी 6.4 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. हा धक्का आचे प्रांताजवळ केंद्रित होता. इंडोनेशियन हवामानशास्त्र, हवामानशास्त्र आणि भूभौतिकशास्त्र एजन्सी (BMKG) च्या माहितीनुसार, भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर होती. हा भूकंप सुमात्रा तसेच आसपासच्या अनेक भागात जाणवला. धक्के इतके तीव्र होते की घरे आणि इमारती हादरल्या, त्यामुळे नागरिक घाबरून घरे सोडून बाहेर खुले मैदानात जमा झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्सुनामीचा कोणताही धोका नाही.

पूर व भूस्खलनानंतर आणखी एक आपत्ती

भूकंपाच्या एक दिवस आधीच इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा प्रांतात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले. यात २४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक शहरांमध्ये बचाव पथकांना पोहोचणे कठीण झाले आहे. सततच्या पावसामुळे नदीचे बंधारे तुटले आहेत आणि डोंगराळ भागातून चिखल ओघळत असल्याने परिस्थिती गंभीर आहे.

रिंग ऑफ फायर’चा सततचा धोका

इंडोनेशिया हा पॅसिफिक महासागरातील ‘रिंग ऑफ फायरभागात स्थित आहे. हा जगातील सर्वात भूकंपप्रवण आणि ज्वालामुखी सक्रिय प्रदेश आहे. त्यामुळे येथे नैसर्गिक आपत्तींचा धोका कायम असतो.

काही दिवसांपूर्वीच आणखी एक मोठा भूकंप

5 नोव्हेंबर 2025 रोजी इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्या घटनेत नुकसान झाले नव्हते, परंतु सलग दुसऱ्यांदा मोठा भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.