मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून पडून 30 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

कोलाड – मुंबईहून मंगळूरकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून पडून 30 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 13) सायंकाळी सुमारे 6 वाजता घडली. ही घटना गोवे गावाच्या हद्दीत रेल्वे पोल क्र. 7/35 जवळ घडली. मृत महिलेचे नाव सविता हिरालाल मखवाना (वय 30, रा. मेघानी, नगर शेरी-7, रणपूर, अमहदाबाद, गुजरात) असे असून, ती रेल्वेतून तोल जाऊन खाली पडली. या वेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते, पोलीस कर्मचारी आणि रेस्क्यू (SVRSS) टीम घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्यात आली. पुढील तपास सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एस. जी. भोजकर करीत आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.