वैष्णोदेवी यात्रामार्गावर भूस्खलनात ३० जणांचा मृत्यू; मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन झाले आहे. मंगळवारी रात्री अर्धकुंवारीजवळ वैष्णोदेवी यात्रामार्गावर झालेल्या भूस्खलनात किमान ३० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी आहेत. रियासीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक परमवीर सिंह यांनी सांगितले की, आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीसह बचावकार्य सुरू आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.

👉 घटनास्थळ आणि परिणाम
भूस्खलन अर्धकुंवारी गुहा मंदिराजवळील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ झाले. त्यामुळे यात्रेकरूंसाठीचा मुख्य मार्ग बंद झाला असून, वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे.

👉 हवामान विभागाचा इशारा
हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस आणि ढगफुटीचा इशारा दिला आहे. खबरदारी म्हणून जम्मू विभागातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच उत्तर रेल्वेने २२ गाड्या रद्द तर २७ गाड्या थांबवून ठेवलेल्या आहेत.

👉 पूरसदृश परिस्थिती
मंगळवारी जम्मू शहरात अवघ्या २४ तासांत २५० मिमी पाऊस झाला. त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरे आणि शेती क्षेत्रात पाणी शिरले असून, रस्ते व पूलांची मोठी हानी झाली आहे. प्रशासनाने ,५०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

👉 बचाव कार्य
जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आणि भारतीय लष्कराचे जवान या बचाव कार्यात गुंतले आहेत. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.