अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात: दरीत ट्रक कोसळून २२ मजदूरांचा मृत्यू
अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या
भीषण अपघातात २२ मजुरांचा मृत्यू झाला. चकलागम परिसरात रस्ते बांधकामाच्या ठिकाणी
मजूर घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. सध्या बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत १३
मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर उर्वरित नऊ मजुरांचा शोध घेतला जात
आहे. हेलोंग–चकलागम रस्त्यावर मेटेलियांगजवळ हा अपघात झाला. रस्त्यावरून जात
असताना अचानक ट्रकचा ताबा सुटला आणि तो थेट दरीत कोसळला. प्रत्यक्षदर्शींनी हा
प्रकार पाहताच पोलिसांना माहिती दिली. मात्र, ही जागा अतिशय
दुर्गम असल्याने पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल १८ तास लागले. त्यानंतर
बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत मृत पावलेले २२ मजूर रस्ते
बांधकामसाठी कार्यरत होते. यापैकी १९ मजूर आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील
गेलापुखुरी टी इस्टेट येथील रहिवासी होते. आतापर्यंत ओळख पटलेल्या मृतांमध्ये
बुधेश्वर दीप, राहुल कुमार, समीर दीप,
जॉन कुमार, पंकज माणकी, अजय
माणकी, विजय कुमार, अभय भूमिज, रोहित माणकी, बिरेंद्र कुमार, आगर
तातीची, धीरेन चेतिया, रजनी नाग,
दीप गौला, रामचबक सोनार, सोनातन नाग, संजय कुमार, करण
कुमार आणि जोनास मुंडा यांचा समावेश आहे. पोलिस पथक व अग्निशमन दल तळ ठोकून
शोधकार्य करत असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे
नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना
घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर येत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त
होत असून दुर्गम भागातील रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला
आहे.