मराठा आंदोलनासाठी जमलेल्या १० लाख भाकऱ्या आता रुग्णालये व अनाथाश्रमांना दान

मराठा आरक्षण आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरातून चटणी-भाकरीची शिदोरी नवी मुंबईत पोहोचली. फक्त तीन दिवसांत तब्बल १० लाख भाकरी जमा झाल्या. चटणी, ठेचा, लोणची, भाजी, पाणी आणि इतर साहित्याचा इतका प्रचंड ओघ वाढला की, वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात मदतीचे ढीग रचले गेले.

आयोजकांना अखेर मदत थांबवा” असे आवाहन करावे लागले.

मदतीचा ओघ एवढा वाढला की…

  • आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मुंबईतील हॉटेल्स बंद राहिली.
  • पाण्याची कमतरता असल्याचा संदेश गावोगावी पसरताच प्रत्येक गावातून "एक शिदोरी आंदोलकांसाठी" मोहिम सुरू झाली.
  • गावकऱ्यांनी वर्गणी काढून भाकरी, चपाती, भाजी, ठेचा, पाणी व इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर मुंबईत पाठवले.
  • आलेले अन्न खराब होऊ नये म्हणून स्वयंसेवकांनी भाकऱ्यांचे वर्गीकरण करून लगेच आंदोलकांना पुरवठा केला.

उरलेल्या अन्नाचा योग्य उपयोग

मंगळवारी आंदोलन संपल्यानंतर उरलेल्या हजारो भाकऱ्या, चटणी, लोणचे आणि पाण्याच्या बाटल्या वाया जाऊ नयेत म्हणून कार्यकर्त्यांनी त्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला.

  • सायन रुग्णालय, जे. जे. रुग्णालयातील रुग्ण
  • मुंबईतील काही अनाथाश्रमातील मुले

यांना हे अन्न व पाणी दान करण्यात आले. विजय माने आणि बबन भिलारे यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांसह या वितरणाची व्यवस्था केली.

गावकऱ्यांची मोठी साथ

गावोगावच्या सामान्य नागरिकांनी आपल्या कुवतीप्रमाणे मदत केली. ही मदत आंदोलनकर्त्यांच्या ताटातच न थांबता समाजातील गरजूंपर्यंत पोहोचल्याने भाकरीचे आंदोलन आता समाजसेवेचेही उदाहरण ठरले”, असे स्थानिकांनी मत व्यक्त केले.