उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले; खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर, दि. २३ एप्रिल २०२६ : जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी निर्माण झालेल्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्रीपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामागे खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करत मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांतील गंभीर पाणीटंचाईची परिस्थिती मांडली होती. भीमा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडल्यामुळे शेतीवर मोठा परिणाम होत होता. पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला होता, तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली होती. या परिस्थितीची दखल घेत प्रशासनाने तातडीने निर्णय घेत उजनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. आजपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.