सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई; ३०.६९ लाखांचे १८४ मोबाइल हस्तगत

सोलापूर : शहर पोलिसांनी गहाळ झालेले तसेच चोरीस गेलेले तब्बल १८४ मोबाइल फोन हस्तगत करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. या मोबाइलची एकूण किंमत सुमारे ३० लाख ६९ हजार रुपये असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाच्या माध्यमातून गहाळ व चोरीस गेलेल्या मोबाइल हँडसेटची माहिती मिळवण्यासाठी CEIR (Central Equipment Identity Register) Portal सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाइलची माहिती प्राप्त करून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकांमार्फत कारवाई केली. तपासादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणांहून १८४ मोबाइल हँडसेट शोधून काढले. त्यानंतर हे मोबाइल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.

चोरीतील मोबाइलसह सोन्याचे दागिनेही हस्तगत

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत चोरीचे मोबाइल आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी आरोपींकडून ५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २६ हजार ६४८ रुपयांचे ३ मोबाइल फोन, असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती देण्यात आली. तसेच गणेश किसन बोघाडे (रा. लोधी गल्ली) याच्याकडून चोरीला गेलेले दोन मोबाइल फोनही हस्तगत करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त अश्विनी पाटील आणि सर्व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस अंमलदार रफिक इनामदार, संतोष पापडे, एकनाथ उबाळे, खाज्या आरोनकर, लक्ष्मीकांत फुटाणे, शैलेश स्वामी, संतोष वाघमोडे आदींच्या पथकाने कारवाई केली.

गहाळ किंवा चोरीस गेलेल्या मोबाइलचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाइलचा माग काढण्यासाठी पोलिसांना मदत होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.