कुर्ल्यात मध्यरात्री मोठा अपघात; JCB शिफ्टिंग करताना क्रेन घरावर कोसळली, ९ जण जखमी
मुंबई : कुर्ल्यात शुक्रवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. कुरैशी
नगर परिसरात JCB मशीन शिफ्ट करत असताना हायड्रॉलिक
क्रेन अचानक कोसळली. ही क्रेन एका घरावर तसेच जवळच्या रेल्वे ट्रॅकवरील
ओव्हरहेड इलेक्ट्रिक उपकरणांवर जाऊन आदळली. ही घटना २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री
सुमारे २.४० वाजता कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यानच्या भागात घडली. या
दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
JCB चे वजन पेलता न आल्याने क्रेन कोसळली
कुर्ला-ट्रॉम्बे परिसरात एमएमआरडीएकडून बांधकामाचे काम
सुरू होते. याच कामादरम्यान क्रेनच्या सहाय्याने JCB मशीन हलवली जात होती. मात्र JCB
चे वजन क्रेनला पेलवले नाही आणि क्रेनचा तोल जाऊन ती थेट घरावर
आणि रेल्वेच्या ट्रॅकवर कोसळली. घटना घडताच स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ
भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपत्कालीन पथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव
घेतली.
रेल्वेच्या OHE वरही क्रेन आदळली
क्रेन कुर्ला-ट्रॉम्बे दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरील ओव्हरहेड
इलेक्ट्रिक लाईनवर आदळली. हा मार्ग प्रामुख्याने मालवाहतूक रेल्वेसाठी वापरला
जात असल्याने मुंबईतील नियमित लोकल रेल्वेसेवेवर मोठा परिणाम झाला नसल्याची माहिती
समोर आली आहे. रेल्वे प्रशासनानेही दुर्घटनेची दखल घेतली असून, घटनास्थळी पडझड हटवण्याचे आणि रेल्वेची यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम सुरू
करण्यात आले.
९ जण जखमी
या दुर्घटनेत ९ जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती
रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात
आले असून, कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, क्रेन नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, कामादरम्यान
सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि दुर्घटनेला जबाबदार कोण, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.