कोयना धरणाचे दरवाजे ६ फूट उघडले; ३३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सातारा : राज्यातील मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून वाढत्या आवकेमुळे धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने वाढवत ६ फूटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजताच्या आकडेवारीनुसार धरणाची पाणीपातळी २१५१ फूट ०८ इंच (६५५.८२८ मीटर) इतकी नोंदविण्यात आली. धरणातील एकूण पाणीसाठा ९०.०३ टीएमसी (८५.५४ टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा ८४.९१ टीएमसी (८४.८० टक्के) इतका आहे. सध्या धरणात ५९,६४३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

वाढत्या जलपातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीला धरणाचे दरवाजे १ फूटावर उघडण्यात आले होते. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने आणि धरणात होणारी आवक वाढत गेल्याने प्रशासनाने दरवाजे टप्प्याटप्प्याने वाढवत ६ फूटांपर्यंत उघडण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोयना नदीपात्रात सध्या सुमारे ३३ हजार ८२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे. नदीपात्रात अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन केले असून ग्रामपातळीवरील यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

गेल्या २४ तासांत कोयना येथे १७७ मिमी तर नवजा येथे २०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होऊ शकते. परिस्थितीनुसार धरणातून होणाऱ्या विसर्गातही वाढ करण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.