तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; मुंबई हायकोर्टाचे कॅन्टीन पुढील आदेशापर्यंत बंद

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनची तपासणी करण्यात आली. तपासणीत काही त्रुटी आढळल्यानंतर मुंबई बार असोसिएशनने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत कॅन्टीन सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्यात सुरू असलेल्या अन्नसुरक्षा मोहिमेदरम्यान अनेक हॉटेल्स व खाद्य आस्थापनांवर कारवाई करण्यात आली होती. त्याविरोधात काही हॉटेल चालकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने एफडीएला केवळ खासगी आस्थापनांवरच नव्हे, तर मंत्रालय, न्यायालये आणि इतर सरकारी कॅन्टीनचीही तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्या अनुषंगाने एफडीएच्या पथकाने मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनची पाहणी केली. तपासणीत काही त्रुटी निदर्शनास आल्याने मुंबई बार असोसिएशनने स्वखुशीने कॅन्टीन सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच एफडीएकडून कॅन्टीन बंद करण्याचे कोणतेही अधिकृत आदेश किंवा नोटीस मिळालेली नसल्याचेही असोसिएशनने नमूद केले. यापूर्वीच्या सुनावणीत हायकोर्टाने एफडीएला सरकारी आणि निमसरकारी संस्थांमधील कॅन्टीनची तपासणी झाली आहे का, तसेच नियमांचे पालन केले जात आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले होते. राज्यातील अन्नसुरक्षा मानके अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.