सोलापुरात ६.८० लाखांचे ३४ ग्रॅम एमडी जप्त; शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई

सोलापूर : अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा ३४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी रूपेश प्रदीप थडसरे (वय ३४, रा. मित्रनगर, शेळगी) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पथक जुना पुणा नाका परिसरात गस्त घालत होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळा पुलाजवळ संशयास्पद हालचाली करत असलेल्या रूपेश थडसरे याला ताब्यात घेण्यात आले.

त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या पावडरची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात आली. तपासणीत ती एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत आरोपीने हा अमली पदार्थ सोलापूर शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, फौजदार मनोज मोरे तसेच बापू साठे, युवराज गायकवाड, सुभाष मुंढे, सैपन सय्यद आदींच्या पथकाने केली.