सोलापुरात बनावट दारूचा भंडाफोड! चिंचोली एमआयडीसीत २ कोटींचा मुद्देमाल जप्त; ५ आरोपी जेरबंद
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने 'ऑपरेशन समन्वय' अंतर्गत मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरात मोठी कारवाई करत बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३ गोदामांसह २ कोटी १ लाख ४५ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमआयडीसीतील एका कारखान्यात बनावट दारू तयार होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. सोलापूर उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. कारवाईदरम्यान 'टँगो पंच'च्या ४१,३०० बाटल्या (४१३ बॉक्स), 'भिंगरी' देशी दारूच्या २,००० बाटल्या (२० बॉक्स), १३,८०० लिटर स्पिरिट, १,२०० लिटर तयार ब्लेंड, ऑटोमॅटिक व सेमी-ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन, आर.ओ. प्लांट, जनरेटर, इलेक्ट्रिकल मोटर्स तसेच लाखो बनावट लेबल, बुचे, रिकाम्या प्लास्टिक बाटल्या आणि कागदी बॉक्स जप्त करण्यात आले.
याशिवाय २ पिकअप, २ कार, ३ दुचाकी
आणि ६ मोबाईल फोन असा मोठा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात हा बनावट मद्यसाठा सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विक्रीसाठी पाठवला जात असल्याचे उघड झाले आहे. या अवैध व्यवसायामुळे शासनाचा ७० लाख ४० हजार ५८७ रुपयांचा महसूल बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित गोदाम भाड्याने देणाऱ्या जागामालकालाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा मिथेनॉलची भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-99999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे अंधत्व, किडनी निकामी होणे आणि अकाली मृत्यू यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा अवैध मद्यापासून दूर राहावे तसेच अवैध मद्यनिर्मिती किंवा विक्रीची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.