विद्यार्थ्यांसमोर सरकार झुकलं; अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदींमुळे चौफेर टीका होत असलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे.  नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीकडून जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन आणि देशभरातून या आंदोलना मिळत असलेला पाठिंबा याच्या पार्श्वभूमीवर  प्रधान यांनी आपल्या पदाचा  राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.  
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अभिजित दिपके काय म्हणाले?

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके म्हणाले की, "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा या गोष्टीचा पुरावा आहे की, जर तुम्ही घाबरला नाहीत आणि या सरकारसमोर झुकला नाहीत, तर आम्ही कोणाचाही राजीनामा घेऊ शकतो." "घाबरण्याची काहीच गरज नाही. ही लोकशाही आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे, पण आमच्या आणखी दोन मागण्या आहेत. आम्ही असेच माघार घेणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, पण ज्या मुलांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. त्या सर्व कुटुंबांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, २० तारखेला ज्या पोलीस गुंडांनी कारवाई केली होती, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे." अशी मागणी दीपके यांनी केली आहे.