गुरुनानक नगरात माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला; आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले
सोलापूर : शहरातील गुरुनानक नगर परिसरात माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात लालचंद वाधवाणी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील संशयित प्रकाश अडवाणी याला एमआयडीसी पोलिसांनी पोलीस आयुक्तालयासमोर ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी लालचंद वाधवाणी आणि प्रकाश अडवाणी हे गुरुनानक नगर येथे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. यावेळी काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात अडवाणी याने वाधवाणी यांच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर प्रकाश अडवाणी दुचाकीवरून तेथून निघून जात होता. दरम्यान, पोलीस आयुक्तालयासमोर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फौजदार अलफाज शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर संशयिताला सदर बझार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या हल्ल्यात लालचंद वाधवाणी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.