१३७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवर नगरसेवक अमोल शिदे यांचा आरोप; "कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत फसवी लोकसंमती बैठक"
सोलापूर महानगरपालिकेसाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने
मंजूर झालेल्या १३७८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवरून वाद निर्माण झाला आहे.
नगरसेवक अमोल शिदे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत या योजनेला नागरिकांची मंजुरी
असल्याचे दाखवण्यासाठी फसव्या पद्धतीने बैठका आयोजित केल्या जात असल्याचा दावा
केला आहे.
अमोल शिदे यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेबाबत लोकांचे मत जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या
बैठकींमध्ये प्रत्यक्ष नागरिकांचा सहभाग कमी असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना
उपस्थित राहण्यास सांगितले जात आहे. त्यानंतर या बैठका लोकसंमती बैठका असल्याचे
दाखवून प्रकल्पाला जनतेचा पाठिंबा असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याचा आरोप
त्यांनी केला. शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या या पाणीपुरवठा
योजनेबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे सांगत शिदे यांनी प्रशासनाने खुल्या
जनसुनावण्या घ्याव्यात, नागरिकांचे आक्षेप आणि सूचना
नोंदवाव्यात तसेच संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करावी, अशी
मागणी केली आहे. योजनेचा आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक
परिणाम लक्षात घेता नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद
केले. लोकशाही प्रक्रियेला बगल देऊन केवळ कागदोपत्री लोकसंमती दाखविणे योग्य
नसल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, या आरोपांबाबत
महापालिका प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसून यासंदर्भातील सत्यता
आणि बैठकींचे स्वरूप याबाबत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
"जागतिक बँकेच्या १३७८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा
योजनेसाठी लोकांची मंजुरी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात
नागरिकांऐवजी कर्मचाऱ्यांना बैठकींना उपस्थित ठेवून लोकसंमतीचा आभास निर्माण केला
जात आहे. ही प्रक्रिया पारदर्शक आणि लोकाभिमुख असावी."