सोलापुरात काँग्रेसचे संघटन सृजन अभियान; विविध पदांसाठी मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत सोलापूर येथे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासह विविध पदांसाठी मुलाखती उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चेतनभाऊ नरोटे आणि प्रकाश यलगुलवार यांनी निरीक्षकांचे स्वागत केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश पक्ष संघटन अधिक सक्षम, संघटित आणि प्रभावी करणे हा आहे. महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमांतर्गत शहर काँग्रेस अध्यक्ष तसेच ब्लॉक व फ्रंटल पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेत देवाशीष पटनायक, धीरज देशमुख, यशराज पारखी, भाऊसाहेब आसबे आणि डॉ. प्रशांत नवगिरे यांनी निरीक्षक म्हणून सहभाग घेतला. पक्षाची विचारधारा आणि जनहिताच्या धोरणांना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी शहर व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.