राम मंदिरात दान मोजणीचे नवे नियम लागू; मोबाईल, बॅग, कॅमेऱ्यावर बंदी, जमिनीवर बसून होणार मोजणी
अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दान मोजणी प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. दान मोजणी अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, दान मोजणी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याला दोन टप्प्यांच्या सुरक्षा तपासणीतून जावे लागणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी नो पॉकेट असलेला डार्क ब्लू रंगाचा ड्रेस अनिवार्य करण्यात आला आहे.
दानाची मोजणी आता खुर्ची-टेबलऐवजी जमिनीवर बसून केली जाणार आहे. मोजणी कक्षात मोबाईल फोन, कॅमेरे, बॅग आणि इतर वैयक्तिक वस्तू घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना कक्षात प्रवेश करण्यापूर्वी चपला बाहेर काढाव्या लागतील. दरम्यान, राम मंदिरातील दानचोरी प्रकरणात सातत्याने नवे खुलासे होत आहेत. तपासादरम्यान आरोपी अनुकल्प मिश्रा याच्या नावावर मंदिरात 'व्यवस्था कार्यकर्ता' म्हणून प्रवेश पास जारी केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष कार्यक्रमांदरम्यान त्याला या पासच्या माध्यमातून मंदिर परिसरात प्रवेश मिळत असल्याचा दावा करण्यात येत असून, दान मोजणी प्रक्रियेतही त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपासात समोर आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य महंत दिनेंद्र दास महाराज यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. "देवाच्या घरात गुन्हे करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे," असे त्यांनी म्हटले. सध्या दानचोरी प्रकरणाचा तपास सुरू असून, सुरक्षा व्यवस्थेत करण्यात आलेले हे बदल भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.