वारदवाडी परिसरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील परंडा-बार्शी मार्गावरील वारदवाडी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात खांडवी (ता. बार्शी) येथील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेराव कोंडीबा पाटील (वय 60) आणि बाबासाहेब भागवत गव्हाणे (वय 55) हे दोघे शेतकरी 8 जून रोजी परंडा येथील साखर कारखान्यात उसाच्या बिलासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेले होते. कारखान्यातील काम पूर्ण करून ते त्यांच्या होंडा दुचाकीवरून (एमएच 13 एफडी 7058) खांडवीकडे परतत होते.

दरम्यान, वारदवाडीजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की सर्जेराव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेब गव्हाणे यांना तातडीने बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेमुळे खांडवी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.