हद्दवाढ भागातील गुंठेवारी प्रश्नांवर मनपा आढावा बैठक; 15 ते 30 एप्रिलदरम्यान विशेष शिबिरे
सोलापूर : हद्दवाढ भागातील गुंठेवारी विकास, मोजणी प्रक्रिया, नोटरी व्यवहार तसेच टी.पी. 4
योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासंदर्भात सोलापूर
महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महापौर विनायक
कोंडयाल यांनी भूषविले. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता
चाकोते, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच आयुक्त डॉ.
सचिन ओम्बासे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत गुंठेवारी
भागातील नोटरी व्यवहारांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुद्रांक उपजिल्हाधिकारी श्रीराम
कोळी यांनी सांगितले की, नोटरीद्वारे करण्यात आलेल्या
व्यवहारांमध्ये मुद्रांक शुल्क टाळले असल्यास संबंधितांनी शासकीय नियमानुसार
नोंदणी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर 15 एप्रिल ते 30
एप्रिल दरम्यान हद्दवाढ भागात विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार
आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांकडून अर्ज स्वीकारून नगररचना, मुद्रांक आणि भूमी अभिलेख विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रक्रिया पूर्ण
केली जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाचे अधिक्षक दादासाहेब घोडके यांनी माहिती
देताना सांगितले की, हद्दवाढ भागातील 12 गावांच्या मोजणीसाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली असून काम सुरू आहे. नेहरू
नगर येथे पथदर्शी प्रकल्प पूर्ण झाला असून पुढील वर्षभरात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण
करण्याचे नियोजन आहे.
तसेच टी.पी. 4 योजनेअंतर्गत 7/12 उताऱ्यांऐवजी
प्रॉपर्टी कार्ड तयार करताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. यावर आयुक्त डॉ.
ओम्बासे यांनी संबंधित विभागांसोबत पुढील बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर
निकाली काढण्याचे निर्देश दिले. महापौर विनायक कोंडयाल म्हणाले की, “हद्दवाढ भागातील नागरिकांना मालमत्ता प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये
यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून काम सुरू आहे. प्रस्तावित शिबिरांमुळे
नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”