सात दिवसांनी पाणी आलं, मोटार लावताना जीव गेला; २४ वर्षीय अभियंत्याचा दुर्दैवी अंत
सोलापूर : शहरातील विस्कळीत आणि अनियमित पाणीपुरवठ्याचा गंभीर
परिणाम पुन्हा एकदा समोर आला आहे. कुमठा नाका परिसरातील जीवन विकास नगर येथे तब्बल
सात दिवसांनंतर नळाला पाणी आले. मात्र, पाण्याचा दाब कमी असल्याने मोटार लावून
पाणी भरताना विजेचा जोरदार धक्का बसून २४ वर्षीय अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू
झाला.
मृत तरुणाचे नाव गणेश मनीष कांबळे (वय २४) असे
आहे. ही घटना रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.
मोटार लावताना विजेचा धक्का
जीवन विकास नगर परिसरात सात-आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा
सुरू झाला होता. पाण्याचा दाब कमी असल्याने गणेश यांनी पाणी भरण्यासाठी छोटी मोटार
लावली होती. सकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. काही वेळाने वीज पूर्ववत
झाल्यानंतर गणेश पाण्याचा पाईप व्यवस्थित लावण्यासाठी गेले. यावेळी त्यांना विजेचा
जोरदार धक्का बसला. गणेश यांना विजेचा धक्का बसताच त्यांनी आरडाओरड केली. आवाज
ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत वीजप्रवाह बंद केला. त्यानंतर त्यांना
उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय
रुग्णालयात हलवण्यात आला.
कुटुंबाचा आधार हरपला
गणेश कांबळे यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण
केले होते. पुण्यात सुमारे दोन वर्षे इंटर्नशिप केल्यानंतर ते सहा महिन्यांपूर्वी
सोलापुरात परतले होते. गणेश यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे
कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांची आई मेसमध्ये काम करून
कुटुंबाचा उदरनिर्वाह करते, तर लहान भाऊ शिक्षण घेत आहे. विशेष
म्हणजे, गणेश यांच्या बहिणीचा विवाह अवघ्या तीन महिन्यांवर
आला होता. लग्नाची तयारी सुरू असतानाच घरातील कर्ता मुलगा गमावल्याने कांबळे
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अनियमित पाणीपुरवठ्यावर नागरिकांचा संताप
सोलापूर शहरातील अनेक भागांत पाच ते सात दिवसांच्या
अंतराने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यातच पाण्याचा दाब कमी
असल्याने नागरिकांना मोटारीच्या सहाय्याने पाणी भरावे लागते. मोटार वापरताना
विजेचा धक्का लागण्याच्या यापूर्वीही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी आणि सुरक्षेचा
प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गणेश यांच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि स्थानिक
नागरिकांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला
आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांना विस्कळीत पाणीपुरवठा आणि कमी दाबाची समस्या
कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.