वादळग्रस्त शेतीची पाहणी करत खासदार प्रणिती शिंदे यांचा रड्डे दौरा; सिंचन, भरपाई आणि रस्ते प्रश्नांवर पाठपुराव्याची ग्वाही

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावाला भेट देऊन वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध प्रश्न जाणून घेतले तसेच शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. रड्डे येथील शेतकरी दादासो कृष्णदेव थोरबोले यांच्या दोन एकर क्षेत्रातील कारल्याचे पीक वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात दोडका पिकाचेही मोठे नुकसान झाले होते. या दोन्ही नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचीही माहिती घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत आणि भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले.

दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी २४ गाव उपसा सिंचन योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली. तसेच शिरनांदगी येथून रड्डे वितरिकेत शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणीही करण्यात आली. यावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदारांनी सांगितले.

याचवेळी पंचायत समिती सदस्य सुरेश ईश्वर कांबळे यांनी रड्डे पंचायत गणातील गावांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते मंजूर करण्याबाबत निवेदन सादर केले. नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधांसाठी आवश्यक असलेल्या या रस्त्यांबाबतही संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.

दौऱ्यादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री Sushilkumar Shinde यांचे विश्वासू सहकारी सुरेश कोळेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

या दौऱ्यात काँग्रेसचे राज्य सचिव रवीकिरण कोळेकर, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.