गारपिटीनंतर खासदार डॉ. ज्योती वाघमारे शेतकऱ्यांच्या बांधावर; तातडीने पंचनाम्यांचे आदेश

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज येवती-पापरी आणि पेनूर परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान

वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागा, केळी आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गोठे व घरांचीही पडझड झाली असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. नुकसान पाहताना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

शेतकऱ्यांना दिलासा

या वेळी खासदारांनी शेतकऱ्यांना धीर देत, “सरकार आणि एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,” असा विश्वास दिला.

तातडीने मदतीसाठी हालचाल

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच प्रशासनातील कृषी अधिकारी, तलाठी आणि सर्कल ऑफिसर यांना त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या पाहणी दौऱ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, भीम वाघमारे, दीपक पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकसानभरपाई मिळवून देणार”

शेतकऱ्यांचे नुकसान पाहून मन हेलावले आहे. केवळ पंचनामे करून थांबणार नाही, तर नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडेपर्यंत पाठपुरावा करेन,” अशी ग्वाही खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिली.