मराठा आरक्षणासाठी सोलापुरात युवकांचा गनिमीकावा; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तसेच मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात मराठा युवकांनी आक्रमक भूमिका घेतली. बुधवारी सकाळी सोमनाथ राऊत यांच्यासह काही मराठा युवकांनी गनिमी काव्याने सोलापूर-पुणे महामार्गालगत असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

यावेळी युवकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, समाजाच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलक युवकांनी केली. सकाळच्या वेळेत अचानक युवक पाण्याच्या टाकीवर चढल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलक युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पाण्याच्या टाकीवरून युवकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसह सरकारच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलक युवकांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले.