कामती प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक; नवीन इमारतीला मुहूर्त कधी?

मोहोळ | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र म्हणून ओळख असलेल्या कामती प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. दररोज सुमारे १०० ते २०० रुग्ण उपचारासाठी या केंद्रात येत असल्याने रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य केंद्राच्या इमारतीचा छताचा स्लॅब जीर्ण झाल्याने तो कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

प्रसूती विभागाचीही दुरवस्था

कामती प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. मात्र, इमारतीचीच अवस्था धोकादायक झाल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः प्रसूती विभागाची अवस्था खराब असल्याची तक्रार आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना अशा वातावरणात उपचार घ्यावे लागत असून, प्रसूतीनंतर आवश्यक असलेल्या स्वच्छतागृहाची सुविधाही अपुरी असल्याचे सांगितले जाते. तसेच पाण्याची उपलब्धता समाधानकारक नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे.

नवीन इमारतीचा प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रतीक्षेत

सध्याची इमारत वापरण्यास अयोग्य असल्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. नवीन इमारतीची आवश्यकता स्पष्ट असतानाही अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही. प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने रुग्णांना जुन्याच धोकादायक इमारतीत उपचार घ्यावे लागत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षाबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींचेही या प्रश्नाकडे लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

त्यामुळे मोहोळचे आमदार राजू खरे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

स्लॅब कोसळून दुर्घटना होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?’

सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली आहे. कामती आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक झाली आहे. रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळून दुर्घटना होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? नवीन इमारतीचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे तातडीने नवीन इमारतीचे काम सुरू करावे; अन्यथा आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांकडून काय सांगण्यात आले?

दरम्यान, कामती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठीचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला असून, नवीन इमारतीची आवश्यकता असल्याचे आरोग्य अधिकारी शांती बाबर यांनी सांगितले. पुढील मंजुरी आणि कार्यवाही शासनस्तरावर होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रस्ताव पाठवून दोन वर्षांचा कालावधी उलटूनही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? नवीन इमारतीसाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न आता कामती परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.