विधानभवनात आमदारांमध्ये बाचाबाची; सचिन कल्याणशेट्टी आणि भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक वाद
मुंबई येथे सुरू
असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात
दोन आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली. सचिन कल्यणाशेट्टी (भाजप) आणि भास्कर जाधव (शिवसेना उबाठा गट) यांच्यात पोर्च परिसरात बाचाबाची झाली. मिळालेल्या
माहितीनुसार, आमदार राहुल आवाडे यांची मुलगी सानिका आणि
राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र अजय यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने
आमदारांच्या खासगी सहाय्यकांकडून लग्नपत्रिका वाटप सुरू होते. विधिमंडळ आवारात
पत्रिका वाटपावरून भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली.
“बाप काढायचा अधिकार आहे का?”
वादाच्या दरम्यान ‘सरकारचा बाप काढला’ असा आरोप करत सचिन
कल्याणशेट्टी यांनी जाधवांना जाब विचारला. “तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का? तुम्ही काढला
तर मीही काढेन,” असे म्हणत त्यांनी तीव्र शब्दांत
प्रतिक्रिया दिली. यावर भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर देताना, “तुम्हाला माझा बाप काढायचा असेल तर काढा,” असे
वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. या शाब्दिक वादामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण
वातावरण निर्माण झाले.
कल्याणशेट्टींची प्रतिक्रिया
या घटनेनंतर सचिन कल्याणशेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना
सांगितले की, “भास्कर जाधव कर्मचाऱ्यांना रागावत होते.
मी सभागृहात प्रवेश करत असताना ते सरकारविषयी अपशब्द वापरत होते. कोणाचा किंवा
सरकारचा बाप काढणं योग्य नाही. काही हरकत असल्यास तक्रार करावी.” विरोधी
पक्षनेतेपदाच्या संदर्भात नाराजीमुळे हे वर्तन असावे, असा
आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या घटनेमुळे अधिवेशनादरम्यान
काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.