बारामतीतील शासकीय वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयाचे नामकरण ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांच्या नावाने
महाराष्ट्र सरकारने बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांच्या नावाने करण्यास मान्यता दिली आहे या निर्णयानुसार संबंधित संकेतस्थळे, अभिलेखे, नोंदवही, फलक, अधिकृत पत्रव्यवहार आणि इतर कागदपत्रांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबईचे आयुक्त आणि संबंधित संस्थांचे अधिष्ठाता यांच्यावर सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या ३ जानेवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्णखाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर २० जुलै २०२१ रोजीच्या निर्णयानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय सुरू करण्यात आले. यापूर्वी ३१ मे २०२३ रोजी या वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती’ असे करण्यात आले होते. आता त्याऐवजी ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे काही संघटनांनी आक्षेप नोंदवला असून, पुढे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.