धार्मिक शिक्षणासाठी गेलेल्या मुलीसोबत नेमकं काय घडलं? आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर :- सोलापुरात धार्मिक शिक्षणासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका मौलानाविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रविवारी सायंकाळी धार्मिक शिक्षणासाठी मदरशात गेली होती. यावेळी संबंधित मौलानाने तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरी परतल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

यानंतर कुटुंबीयांनी तातडीने सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मौलाना मोहम्मद उमर रिझवी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. आरोपी मोहम्मद उमर रिझवी हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून गेल्या काही वर्षांपासून सोलापुरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.