विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा : महापौर विनायक कोंडयाल

सोलापूर : शहराच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा उपयोग करण्याच्या दृष्टीने एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ येथे आयोजित ‘संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनचा यशस्वी समारोप झाला. या उपक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शहरातील विविध नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सादर केले. यावेळी सोलापूरचे महापौर विनायक कोंडयाल म्हणाले की, “या हॅकाथॉनमधून मिळालेल्या संकल्पना शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या ठरतील. या कल्पनांची अंमलबजावणी करून नागरी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका पुढाकार घेणार आहे.” कार्यक्रमाला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, तसेच मान्यवर उपस्थित होते. आयुक्तांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे पुढील ६ महिने ते १ वर्षांत प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक मदत दिली जाईल. विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या हॅकाथॉनमध्ये वाहतूक व पार्किंग व्यवस्थापन, रस्त्यांची स्थिती, पाणी वितरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि डेटा-आधारित आरोग्य व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर उपाय सुचवण्यात आले. देशातील १० राज्यांमधील सुमारे २७०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. एकूण ५४६ संघांमधून ७५ संघांची निवड करण्यात आली होती, तर अंतिम फेरीत २५ संघांनी आपले प्रकल्प सादर केले. स्पर्धेत RV College of Engineering च्या ‘टीम अॅक्वाबाइट’ने प्रथम क्रमांक पटकावला, तर SIES Graduate School of Technology च्या ‘टीम सुपरनोवा’ने द्वितीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे २ लाख आणि १ लाखांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच इतर उत्कृष्ट संघांनाही रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आंतरशाखीय सहभाग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष नागरी समस्यांवर आधारित उपाययोजना. ‘संवेद २०२६’ हा उपक्रम शासन, शिक्षण आणि उद्योग यांच्यातील समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरला असून, स्मार्ट आणि शाश्वत शहरी विकासासाठी विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना नवे व्यासपीठ मिळाले आहे.