भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करण्याची मागणी; सोलापूर युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर : प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार
कराराच्या विरोधात सोलापूर युवक काँग्रेस आक्रमक झाली असून, हा
करार रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रणिती
शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार शहर युवक
काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. यावेळी
बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रस्तावित ‘US-India
Trade Deal’ हा केवळ आर्थिक करार नसून देशातील शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.
शेतकऱ्यांवर परिणामाची भीती
या करारानुसार अमेरिकेतील कृषी उत्पादनांवर शून्य टक्के आयात शुल्क
लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त परदेशी उत्पादने भारतीय बाजारात मोठ्या
प्रमाणावर येतील आणि स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल, असा
आरोप करण्यात आला. तसेच, या करारामुळे कृषी उत्पादन बाजार समिती (APMC)
व्यवस्था आणि किमान आधारभूत किंमत (MSP) यांची
उपयुक्तता कमी होऊ शकते. स्थानिक उत्पादनांऐवजी आयातीत मालाला प्राधान्य दिले जाईल,
अशीही भीती व्यक्त करण्यात आली.
दुग्धव्यवसायालाही फटका
स्वस्त आयातीत दूध व दुग्धजन्य पदार्थांमुळे गावपातळीवरील दुग्ध
उत्पादकांचे उत्पन्न घटण्याची शक्यता असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो,
असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
खाजगी कंपन्यांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता
या करारामुळे कृषी क्षेत्रात मोठ्या खाजगी कंपन्यांचे वर्चस्व वाढेल
आणि शेतकरी स्वतःच्या जमिनीवर मजूर बनण्याची वेळ येऊ शकते, अशी
टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका व्यापार करार तात्काळ रद्द
करण्याची मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
या वेळी महेश लोंढे, विवेक इंगळे, धीरज
खंदारे, सचिन पवार, दाऊद नदाफ, शशिकांत शेळके, आकाश जांभळे, महेंद्र
शिंदे, अस्लम शेख, आकाश नाईक, अभिषेक पाटोळे, अजय रणदिवे, युवराज
दोडमनी आदी पदाधिकारी उपस्थित होते.