सोलापुरात बेकायदेशीर पार्किंगवर कडक कारवाई; २ मेपासून दंडाची मोहीम

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका कडून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य रस्ते व सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या दुचाकी व चारचाकी वाहने उभी करणाऱ्यांवर २ मे २०२६ पासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवली जात असून, अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई अतिक्रमण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाणार आहे.

दंडाची रचना पुढीलप्रमाणे:

  • दुचाकी वाहन: ₹1,500 दंड + ₹500 जप्ती खर्च = ₹2,000
  • चारचाकी वाहन: ₹5,000 दंड + ₹2,000 जप्ती खर्च = ₹7,000

बेकायदेशीररित्या उभी केलेली वाहने जप्त करण्यात येतील आणि संबंधित दंड भरल्यानंतरच ती परत दिली जाणार आहेत. महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहने रस्त्यावर अनधिकृतपणे उभी न करता नियमांचे पालन करून शहरातील वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी महानगरपालिकेशी ई-मेलद्वारे संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळवले आहे.