आंबेडकर जयंती मिरवणुकीपूर्वी मार्गाची पाहणी; सोलापूर महापालिकेची जय्यत तयारी

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १९ एप्रिल रोजी निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेकडून मिरवणूक मार्गाची सखोल पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, तसेच महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान मिरवणूक मार्गावरील विविध बाबींची तपासणी करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या छाटणे, खराब रस्त्यांची दुरुस्ती, तसेच विद्युत दिव्यांची देखभाल तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले की, मिरवणूक मार्गावर वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक वळविणे, बंदोबस्त वाढविणे आणि नियंत्रणासाठी विशेष पथके नियुक्त केली जाणार आहेत. दरम्यान, महापौर विनायक कोंड्याल यांनी प्रशासनाच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करत नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभागी व्हावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.