पावसाळ्यापूर्वी महापालिका अलर्ट मोडवर; शहरातील ७४ नाले आणि १९ विकासकामांचा आढावा

सोलापूर :- आगामी पावसाळ्यात सोलापूर शहरात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शहरातील नाले, नाला विकास कामे आणि नाला सफाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत शहरातील एकूण ७४ नाल्यांची सद्यस्थिती, त्यांची वहन क्षमता, सुरू असलेली सफाई मोहीम, आवश्यक दुरुस्तीची कामे तसेच पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यासोबतच शहरातील प्रस्तावित १९ नाला विकास प्रकल्पांच्या प्रगतीचाही स्वतंत्र आढावा घेण्यात आला. विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८ अंतर्गत सुरू असलेल्या नाला सफाई मोहिमेचा आढावा घेताना अधिकाऱ्यांनी शहरातील सुमारे ७० ते ८० टक्के नाला सफाई पूर्ण झाल्याची माहिती दिली. उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाले स्वच्छ करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. बैठकीत विशेषतः पजवणी मार्केट, मुळेगाव नाका आणि अक्कलकोट रोडवरील मुद्रा सन सिटी परिसरातील मागील वर्षीच्या पाणी साचण्याच्या घटनांवर चर्चा झाली. या संवेदनशील भागांमध्ये पाणी साचण्याची कारणे, राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रातील जलनिस्सारण व्यवस्था आणि आवश्यक सुधारणा याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी शहरातील सर्व नाल्यांची नियमित पाहणी करून आवश्यक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यादरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आक्कुलवार, प्रकाश दिवाणजी तसेच विभागीय अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.