गणेशखिंड रोडवर अडवली कार अन् उघड झाला मोठा खेळ; बनावट विदेशी मद्य रॅकेटचा पर्दाफाश

जुन्नर आणि परिसरात सुरू असलेल्या बनावट विदेशी मद्याच्या अवैध व्यवसायावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपीसह त्याला रिकाम्या बाटल्या पुरवणाऱ्या भंगार विक्रेत्याला अटक करण्यात आली असून एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नारायणगाव पथकाला जुन्नर-गणेशखिंड रोडमार्गे बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गणेशखिंड रोडवर सापळा रचून संशयित वॅगनआर कार (MH 01 AX 2884) अडवली. वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये चंदीगड निर्मितीचे लेबल लावलेले बनावट विदेशी मद्य आढळून आले. या प्रकरणी गोविंद शंकर जाधव (रा. निरगुडे, ता. जुन्नर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीला रिकाम्या विदेशी मद्याच्या बाटल्या पुरवणाऱ्या भंगार विक्रेत्याचाही सहभाग उघडकीस आला. त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान बनावट विदेशी मद्याचा साठा, रिकाम्या बाटल्या, बुचे आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वॅगनआर कार असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच बनावट मद्याचा पुरवठा कुठे-कुठे केला जात होता याचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.