"ही नैसर्गिक की रासायनिक ताडी?" बाटल्या घेऊन प्रशासनाला घेराव; फॉरेन्सिक तपासणीची मागणी

सोलापूर :- सोलापूर शहरातील बेकायदेशीर आणि कथित भेसळयुक्त ताडी विक्री केंद्रांविरोधात मोची समाज युवक संघटनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष मोहन जंगम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देत शहरातील ताडी विक्री केंद्रांची विशेष चौकशी करण्याची मागणी केली. या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शिष्टमंडळाने नैसर्गिक ताडी आणि रासायनिक मिश्रण असल्याचा संशय असलेल्या ताडीच्या बाटल्या थेट अधिकाऱ्यांसमोर सादर केल्या. संबंधित नमुन्यांची तात्काळ फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनानुसार, सोलापूरातील लष्कर, मोदीखाना, बापूजी नगर, फॉरेस्ट आणि इरन्ना वस्ती परिसरातील काही ताडी विक्री केंद्रांमुळे सामाजिक, आरोग्यविषयक आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. स्थानिक नागरिकांकडून सातत्याने भेसळयुक्त व आरोग्यास अपायकारक ताडी विक्री होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. ताडी विक्री केंद्रांमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असल्याचे सांगत संघटनेने कामगार, महिला आणि युवकांच्या आरोग्य व आर्थिक स्थितीवर याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली.

संघटनेने प्रशासनाकडे शहरातील सर्व ताडी विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविणे, नमुने शासकीय व फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे, दोषी आढळल्यास परवाने रद्द करणे आणि विक्री केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष मोहन जंगम यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, "संशयित ताडीचे नमुने आम्ही प्रशासनासमोर सादर केले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर सोलापूरकरांच्या आरोग्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारले जाईल."
या अनोख्या पद्धतीने बाटल्यांसह करण्यात आलेल्या निवेदनामुळे शहरातील ताडी विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.